बकुळ फुले…

आमचं घर केळकर बागेत… घर म्हणजे वाडा, वाड्यापासून साधारणपणे दहा-पंधरा घरे सोडून पश्चिमेला गेलं, की मोठ्ठा चौक लागायचा. तेथूनच जवळ बिस्किट महादेव. आता या महादेवाच्या मंदिराला बिस्किट महादेव का म्हणत, ते काही केल्या कळत नाही, म्हणजे नाहीच. अजून एक महादेवाचे मंदिर असेच प्रसिद्ध. ते म्हणजे मिलिट्री महादेव.

मिलिट्री महादेवचं मंदिर माझ्या आजोळच्या कचेरी गल्लीतील वाड्यापासून तसं पाहिलं, तर जवळ आणि लांबही. हे मंदिर लष्कराच्या ताब्यात असल्यानं त्याला मिलिट्री महादेव म्हणून सगळं गावच ओळखणार की. तिथे मक्याच्या लाह्या मिळायच्या, त्यापण गरमागरम… त्यांचा वास संध्याकाळच्या वेळेला पोटातली नको असलेली भूकही जागवायचा. त्या काळात दुर्मिळ असणाऱ्या मशिनमध्ये ताज्या तडतडणाऱ्या मक्याच्या लाह्या अशा पाण्याची उकळी आल्यासारख्या उसळून वर यायच्या. त्या लाह्या दररोज खायला मिळत नसल्या, तरी त्यांचा वास त्या लाह्यांपाशी खिळवून म्हणजे घट्ट खिळवूनच ठेवायच्या की. तो मशिन चालवणारा ते काचेचं झाकण वर उचलणार, आतल्या गरमागरम लाह्या पुड्यातून घायला देणार. मग पुन्हा मक्याचे दाणे यंत्रात टाकणार, वरती मसालाही घालणार. मग पुन्हा झाकण लावून मशिन सुरू करणार. आतून लाह्या टणाटणा वर येणार. वट्ट बघत बसावंसं वाटणार नाही तर काय…

घरी असलं, की बिस्किट महादेव, आणि आजोळी गेलं की, मिलिट्री महादेव ही संध्याकाळची हुंदडायची ठिकाणं. सिसॉ, घसरगुंडी, झोपाळा हे आवडीचे खेळ… कोपऱ्यावरच्या चौकात बकुळ फुलांची भली मोठी झाडे रांगेत उभी होती. संध्याकाळी त्या फुलांचा टप्पोरा सडा पडायचा. ती फुले गोळा करून घरी आईसाठी न्यायची… वाड्यातली आम्ही सगळीच मुले आपापल्या आयांसाठी ती फुले गोळा करायला धडपडायचो….

आई मग छान बकुळीच्या वेण्या करणारच की. कधी बेहरेकाकू करणार, कधी आई करणार. बेहरेकाकू मुळच्या गोव्याकडच्या. त्यांना फुलं आवडायची म्हणजे आवडायचीच की. हौसेनं वितभर तरी वेणी रोज केसांत माळणारच. आई आणि त्या, दोघी गप्पा मारत केव्हा वेण्या करायच्या कळायचं नाही म्हणजे नाहीच की.

एकंदर गाव तसं सुगंधीच की…

आजोळच्या वाड्यात तर चाफाही होता. मिलिट्री महादेवाच्या आवारातही बकुळ फुलं होती. त्यांच्या जोडीला निलिगीरीची झाडं होती. पानांना नुसता हातानं चुरगाळलं, तरी लगेचच निलगिरीचा सुगंध मन प्रसन्न करायचा. त्या बागेत नुसतं बसून राहिलं, तरी वेगवेगळ्या फुलांचा संध्याकाळी दरवळणारा गंध मनाला गुंगवायचा म्हणजे गुंगवायचाच. आज दोन-तीन दशकानंतरही लहानपणच्या त्या आठवणी अजुनही फेर धरून आहेत. आजोळी उन्हाळ्याच्या सुट्टीत आक्कामावशी, बेबीमावशी, बंडामामा, घेसासकाका, छत्रेकाका, मामीही यायची. मामेभावंडं, तसेच मावसभावंडंही असायची. संध्याकाळी त्यांच्याबरोबर उत्साहाने मिलिट्री महादेव हा ठरलेला म्हणजे ठरलेलाच.

तिथेच रसाचं गुऱ्हाळ होतं. आणि आमच्या गावची खास खासियत, ती म्हणजे आलेपाक.

आलेपाक म्हणजे आल्याची वडी नव्हे. हा आलेपाक खास आमच्या गावचाच. काय-काय तो त्यात घालायचा ते त्याला म्हणजे त्यालाच माहिती. शेंगदाण्याला काहीतरी मसाला लावलेला. सोबत डाळीचे लाडू… हिरवी मिरची, कोथिंबीर घातलेले. काका, एका लाडू द्या ना, म्हणून जास्तीचा लाडू मागून घ्यायचाच. रसाबरोबर तो आलेपाक खायचा. रसाचा ग्लास संपूच नये, असं कायम वाटत रहायचं.

दोन-तीन वर्षांपूर्वी गेलो होतो, त्यावेळी एकटात आलेपाकवाला भेटला… त्याच्याकडून पैसे देवून जास्तीचे लाडू घेतले. मनसोक्त आलेपाक खाल्ला… असो.

कचेरी गल्ली सगळी नावाने ओळखणारी.

आगाशांचा नातू ना तू… त्यामुळे इकडे तिकडे वावगे वागायला जागा नाही म्हणजे नाहीच. घराशेजारीच देऊळ. दुपारी घरातले सगळे वामकुक्षीकरता पडले, की देवळात पळायचे. देवळाच्या सभागृहात खेळ रंगायचे. कुणी आवाज करायचं कामच नाय… देऊळ आपलंच ना. मग खेळात कुणाला घ्यायचं, कुणाला नाही आम्हीच ठरवणार की.

लहानपणीचे कितीतरी सवंगडी. आता त्यांची मुलेही मोठी झाली.

मनानं मी मात्र अजूनही तिथंच आहे. देशाच्या पाठीवर कुठेही गेलं, तरी मनाच्या एका कोपऱ्यात मिलिट्री महादेव, बिस्किट महादेव, आलेपाक, बकुळ फुले, चाफा सगळं दरवळत राहतं. मन प्रसन्न राहतं. आताही मी मनानं आमच्या वाड्यात आहे. वाड्यातले, समोरच्या चाळीतले सवंगडी हातात हात घालून डोळ्यांसमोर आहेत. त्यांची नावे लिहायचा टाळतोय, म्हणजे टाळतोयच की. कुणी सांगावं, तुमच्यातलं कुणीतरी त्यातील एक असणार, मग आमचंच नाव का लिहिलं, म्हणून मला विचारणार.

उन्हाळा कधी जाणवलाच नाही. रात्रीसुद्धा अंगावर गोधडी घ्यावी लागणार म्हणजे घ्यावी लागणारच. दुपारचा वळवाचा गारांचा टप्पोर पाऊस, त्या गारा गोळ्या करण्याकरता पावसात भिजत चाललेली धडपड, कुणी किती गोळ्या केल्या यावरून एकमेकांशी भांडायचं म्हणजे भांडायचंच की.

आता कचेरी गल्ली ओळखू येत नाही, आणि आमची केळकरबागही. चौकातली झाडे तर रुंदीकरणात केव्हाच आडवी झाली. कचेरीगल्लीतले बहुतांश वाडे जमिनदोस्त होऊन तिथे अपार्टमेंट उभ्या राहिल्या आहेत, कुणी बंगले बांधले आहेत. केळकरबागेचेही तेच.

बिस्किट महादेवाचं मंदिर बदललं, तिथे गावातल्या घरांची ती काय कथा…

बदललं नाही ते, कचेरीगल्लीतलं आमचं श्रीगणेशाचं देऊळ. आजही ते मंदिर उभे आहे, आहे तस्संच… आसपासची बिऱ्हाडं बदलली, पण मंदिर तेच….

म्हणून हल्ली मी फार कमीवेळा गावाकडं जातो. जुन्या आणि नव्या पिढीतल्या बदलांची नोंद ठेवलेली आमची पिढी. आमच्या लहानपणी घरी एक रेडिओ होता, व्हॉल्ववर चालणारा, आगाशेआजोबांनी घेतलेला. क्रिकेटची मॅच असली, की आमचे आजोबा सोप्यात सतरंजी अंथरणार, बाहेर फळ्यावर स्कोअर लिहून ठेवणार की. ज्याला क्रिकेटमधलं फार काही कळत नाही, त्याच्यासाठी फाईन लेग, स्लिप, कव्हर, पॉईंट अशा जागा खडूने लिहून दाखवणार. मी त्यावेळी तीन-चार वर्षांचाच असणार, असणार म्हणजे असणारच की. आपल्याला काय त्यावेळी ओ का ठो कळायचं नाही. पण आजोबा हसले, आणि बाकिच्यांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे आम्हाला गलका करायला कारण मिळणारच की. म्हणून तिथं बसून राहायचं.

या आजोबांना आम्ही चंचीआजोबा म्हणायचो की. का म्हणजे, त्यांच्या कमरेला चंची खोचलेली असणार. त्यात हिरवीगार पाने, सुपारी, कात, अडकित्ता, चुना, तंबाखू असणार. खोलीत शिरल्यावर त्यांचीच कॉट समोर असणार. त्यावर ते शांतपणे बसून आम्हाला या, म्हणून जवळ करणार. मग, चंचीदादा पान द्या म्हणून आम्ही हट्ट धरणारच की. मग ते शांतपणे एक चांगले लांबसडक पान निवडणार. त्याच्या शिरा नखानं अलवारपणे काढणार. सुपारी अडकित्यानं अशी कातरणार, की सुपारीचा एकेक उभा पापुद्राच निघणार. सगळे गोल गोलच की. मग ती कातरलेली सुपारी, थोडासा म्हणजे थोडासाच चुना पानाला लावून, कात टाकून मस्त पान देणार. असं पान दुसऱ्या कोणाला येतंय होय. ते आमचे चंचीदादाच करणार.

चंचीदादांना फुलांची फार आवड. त्यांनीच परसात झाडं लावलेली. मोगरीची तर कितीतरी झाडं…

त्या मोगरीची ताजी टप्पोरी फुले प्यायच्या पिपात टाकायची. मग त्या पाण्याला मोगरीचा मस्त वास येणार. उन्हाळ्यात कितीही तहान लागली, की एक ग्लास थंड मोगरीचं पाणी प्यायलं, की बरं म्हणजे बरंच वाटणार.

कॉफीही घरचीच.

कॉफीच्या झाडांना फळं आली, की ते फळं पिकल्यावर गोळा करणार, मस्त उन्हात वाळत घालणार. आणि मग त्या फळांचा गर गेला, बिया खट्ट वाळल्या की आतल्या बियांची ते पावडर करणार. घरची ताजी वाफाळलेली कॉफी पिताना कसली मजा वाटणार, म्हणजे वाटणारच की.

बकुळ फुलं आता फार नाही पहायला मिळत. ना गावात ना फुलांच्या दुकानात.

कुणीतरी म्हटलं होतं, माणसानं जेव्हा स्वतःचं घर उभारण्यासाठी जेव्हा झाडांवर पहिली कुऱ्हाड चालवली, त्याचवेळी त्याने पर्यावरणाबद्दल बोलायचा हक्क गमावला होता.

दोन्ही वाडे केव्हाच विकून झालेत, कचेरीगल्लीतल्या वाड्याची आता अपार्टमेंट झाल्लीय्ये. केळकरबागेतला वाडा अजूनही पाडलेला नाही. तेथली विहिर शेजारच्यांनी ताजी ठेवली आहे. मोटार बसवलीय्ये त्यांनी नळाचं पाणी वट्ट पिणार नाहीत. आमच्या विहिरीचंच पाणी पिणार. त्यात पावसाळ्यात, उन्हाळ्यात कॉर्पोरेशननं दिलेलं औषध घालणार की. ताज्या आणि तळातल्या पाण्याचा म्हणजे त्रास होत नाही.

कचेरीगल्लीतला वाडा नाही, म्हणून तिथं जायचं नाही. केळकरबागेतला विकलाय, म्हणून तिथंही नाही. गाव आपलं असून परकंच झालंय की. असो.

आता गाव म्हणजे क्राँक्रिटचं जंगलच झालंय की. अशा या जंगलात सुगंधी आठवणींच्या कुप्या सांभाळणारी माणसं राहतात का, याचा शोध घ्यायचाय. आठवणी कटुही असतात. मात्र, सुगंधी आठवणींच्या नाजूक कुप्या ज्याला सांभाळायला जमल्या, तो काँक्रिटच्या जंगलातला नव्हे, तर आपल्याच गावातलाच आहे, याची खुणगाठ नक्की झाली, म्हणजे झालीच की.

– संजीव ओक

2 thoughts on “बकुळ फुले…

  1. काय मामा? ….. बेळगांवचं नाव लिहायचं पण टाळलंस?? त्याचं वाड्यात माझं मामा राहायचा …. काशिनाथ जोगळेकर. लहानपणी यायचो तिथे … खूप मजा यायची त्या परिसरात. बिस्कीट महादेव, मिल्ट्री महादेव सगळ्या आठवणी क्षणात जाग्या झाल्या. अजून एक आठवण जागी झाली …. एका “संजीव ओक” या वल्लीला लहानपणी भेटल्याची … जो सु.शी. चा निस्सीम भक्त होता आणि एका पुस्तकाचं प्रकाशन करणार होता….. नंतर मात्र कधी भेट झाली नाही. आता होईल कदाचित असं वाटतं ….
    आनंद भातखंडे, डोंबिवली.

Leave a comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.